Afleveringen
-
मित्रा देसाई... जगापुढे भारतीयत्वाची खरी ओळख पुढे आणण्यासाठी संशोधन, लेखन आणि संवादातून तेजोमय भारत सारखी संकल्पना पुढे आणणारी, शीतळा, फ्लॅग ऑफ अनंता यांसारख्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची लेखिका आणि तेजोमय भारत सारख्या संकल्पनेतून भारताचा खरा इतिहास जगापुढे उलगडू पाहणारी ऑस्ट्रेलियात राहणारी मराठमोळी लेखिका. अत्यंत अभ्यासपूर्वक, सप्रमाण आपले मुद्दे मांडून त्याची उलगडून स्टोरीटेलिंग म्हणजेच गोष्टीरुपांत जगापुढे आणू पाहणारी ही विदुषि संतोष देशपांडे यांच्याशी जेव्हा संवाद साधते त्यातून कित्येक गोष्टींची सहज उलगड होत जाते... आपण प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, अनुभवावा आणि त्यातून बोध घ्यावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.
-
शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सामना या दैनिकाचे दिल्लीतील ब्युरो चिफ नीलेशकुमार कुलकर्णी यांनी गेली अनेक वर्षांत दिल्लीतील राजकारण विशेषतः तेथील मराठीजनांचा प्रभाव अनुभवलेला आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांशी जवळून संबंध आला आहे. त्यांची नोंद ठेवतानाच दिल्लीतील संसदेच्या आठवणींचा पट उलगडणारे पुस्तक त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. `संसद भवन ते सेंट्रल व्हीस्टा` हे ते बहुचर्चित पुस्तक. त्यानिमित्ताने संतोष देशपांडे यांच्याशी संवाद साधताना नीलेशकुमार यांनी दिल्लीतील राजकारणाची सच्चाई मांडली आहे आणि तिच्याशी होत असणारा `सामना`ही उलगडून दाखवला आहे.
-
Zijn er afleveringen die ontbreken?
-
निवेदन हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडून अत्यंत मेहनतीतून त्यात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्याची किमया स्नेहल दामले यांनी साधली आहे. अभ्यासपूर्ण, आशयघन आणि संयत अशा निवेदनशैलीमुळे स्नेहलला रसिकप्रियता लाभली आहे. सांस्कृतिक, सांगीतिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकारांतील कार्यक्रमांना तिचे निवेदन, सूत्रसंचालन उंची देऊन जाते. पुण्यातील प्रतिष्ठीत वसंतोत्सव असो, अ.भा. मराठी साहित्य संमेलन असो, जागतिक मराठी परिषदेचे संमेलन असो वा अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा असोत स्नेहलने आपली कारकिर्द बहरत नेली आहे. तिच्यासमवेतच्या या गप्पांमधून तिचा प्रवास तर उलगडतोच शिवाय निवेदनकलेतील अनेक कौशल्यांचीही उलगड होते. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठीही या गप्पा मार्गदर्शक ठराव्यात.
-
पुस्तक वाचनातून उत्तम वाचकच घडतो असं नव्हे तर त्यातून प्रेरणा घेत उत्तम लेखकही घडू शकतो. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित युवा लेखक, संपादक प्रणव सखदेव हे त्याचेच एक आदर्श उदाहरण. प्रणव सखदेवचा लेखनाकडे झालेला प्रवास, त्यातील अनुभव, त्याचे चौफेर वाचन आणि साहित्यनिर्मितीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट.
-
पाकिस्तानची आजची अवस्था पाहता देश म्हणून तो सपशेल अपयशी असल्याचे पुढे येते. प्रत्येक आघाडीवर त्याची केवळ पिछेहाटच नव्हे तर तर दयनीय अवस्था झालेली आहे. हे असे का झाले, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेथील लष्कर काय करते, राज्यकर्ते दिशाहीन का आहेत, तिथे मध्यमवर्ग का नाहीय या व अशा प्रश्नांची मालिका पुढे येते. त्याचीच संगतवार मांडणी करणारे `पाकिस्तान का मतलब क्या` हे पुस्तक नुकतेच दाखल झाले आहे. सध्या बेस्टसेलर म्हणून गाजत असलेल्या या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीधर लोणी यांच्याशी याच विषयावर रंगलेल्या या गप्पा.
-
देशातील सर्वात प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थांपैकी एक आणि सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्था म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील आंदोलनांच्या अतिरेकामुळे ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. तथापि, गेल्या अडीच-तीन वर्षांत चित्र बदलते आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वात आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन बदल होत असल्याने परिस्थिती सुधारताना दिसते आहे.हे बदल काय आहेत? विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टीने हे बदल कसे सकारात्मक भूमिका बजावतील? जेएनयूच्या कुलगुरु डॉ. शांतीश्री पंडीत यांची याविषयी विशेष मुलाखत.
-
देशाची राजधानी दिल्ली मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. मात्र, तरीही मराठीजनांना दिल्ली कायमच दूर वाटते. आगामी मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होते आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील टीव्ही माध्यमात कार्यरत असणारे युवा पत्रकार सोमेश कोलगे यांच्य़ाशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक वेगळ्या बाबींची उलगड झाली. मराठी माणूस दिल्लीत रमतो का, तेथील मराठी संस्कृती कशी आहे, अन्य घटकांना मराठीजनांविषयी काय वाटते अशा अनेक बाबींवर सोमेश कोलगे यांनी या सहजगप्पांमधून प्रकाश टाकला आहे.
-
स्टोरीटेलवर नुकतीच संपूर्ण एआय निर्मिती असणारी गोष्ट दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रयोग नेमका काय आहे, चीनच्या डीपसीकने अमेरिकेची झोप का उडवली आहे आणि ट्रम्पतात्यांचे धोरण काय सांगते अशा साऱ्या गोष्टींची गप्पांमधून उलगड केली आहे, योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. नवी आणि वेगळी माहिती देणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि संपन्न व्हा!
-
रहस्यकथा आवडणाऱ्या वाचकांना एक नवा लेखक लाभला आहे. त्याचं नाव सौरभ वागळे. स्वतः आयआयटीएन असलेल्या या युवा लेखकाने रहस्यकथा या साहित्यप्रकारात आपली अशी एक दुनिया उभी केली आहे. त्यास वाचकांचा विशेषतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी सौरभला त्याची ही दुनिया उलगडून दाखवण्यासाठी बोलतं केलं आहे. नव्या पिढीतील हा आश्वासक लेखक नेमकं काय वाचतो, त्याच्या लेखनामागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, ऑफीस आणि लेखन यांचा मेळ तो कसा साधतो, त्याच्या कथांमधील मुख्य पात्र असणाऱ्या `डिटेक्टिव्ह अल्फा` नंतर त्याच्या मनात काय आहे...हे सारं काही जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि इतरांपर्यंतही पोहोचवा.
-
मनोरंजन हा मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रसिद्ध झाला. या अंकातील वैविध्यपूर्ण संपादकीय लेखनाबरोबरच यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीही अत्यंत रंजक होत्या. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमध्ये. ११५ वर्षांपूर्वीच्या या जाहिरातींमधून त्या काळातील व्यवसाय, उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींमध्ये कशी भाषा वापरली जायची, हे ऐकणे रंजक ठरेल. तेव्हा अनुभवू या एक प्रकारचा `टाइम ट्रॅव्हल`!
-
नवे वर्ष लागल्यानंतर असे कोणते साधे-सोपे संकल्प आपण करु शकतो आणि ते पूर्ण करु शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात नवे पर्व येईल..त्याविषयी वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी.
-
जगात दहशतवाद पसरवण्याबद्दल आधीच प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानची ओळख आता भिकाऱ्यांचा निर्यातदार अशीही बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यातील संबंधही बिघडण्याच्या मार्गावर आहेत. खुद्द पाकिस्तानात भिक मागणे हा एक मोठा व्यवसाय होऊन बसला आहे. हे सारं नेमकं काय चाललं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा.
-
अशोक रावकवी.... देशातील एलजीबीटीक्यू समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नाव. पुण्यात झालेल्या मूकनायक २०२४ या एलजीबीटीक्यू समूहाच्या साहित्य संमेलनात त्यांनी एका सत्रात आपले अनुभव सांगितले. या प्रसंगी, त्यांनी आपली समलैंगिक ओळख उघड झाली तो क्षण पुस्तकातून ज्या लेखातून मांडला, त्याचेही प्रकट वाचन झाले. खरे तर हे मोठे धाडसच म्हणायचे. मात्र, त्यांनी ते दाखवले. तेव्हाचे हे रेकॉर्डिंग.
-
जगभरातील मराठीजनांमध्ये आत्मविश्वास जागवत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत उभं करण्यासाठी गर्जे मराठी ही संस्था उदयास आली. आता ही संस्था एक चळवळ बनली आहे. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांसमवेतच्या या संवादातून. प्रत्येक मराठीजनास अभिमान वाटावा, अशा या विचारांना ऐकणं म्हणजे मनात नव्या प्रेरणा जागवणं...
-
दिल्ली आणि महाराष्ट्रातील संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फोडले असे म्हणतात...तर महाराष्ट्रगीतात महाराष्ट्र हे दिल्लीचेही तख्त राखतो असे म्हणतात. या अनुषंगाने इतिहासाचे संशोधक व प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंधांचा वेध संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून घेतला आहे. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.
-
जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद.
-
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ नये..मात्र त्याची नोंद जरुर ठेवावी अशा अनेक गोष्टी इथे उलगडतील.
-
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून गायक आणि रेकॉर्डर यांच्यातील एक आगळं नातं पुढं आलं. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे हे दोन्ही दिग्गज त्यांच्या आजवरच्या प्रवासाकडे कसे पाहतात, त्यांचं आगळं जग त्यांनी कसं उभं केलं, त्यातील टर्निंग पॉइंटस् कोणते आणि या क्षेत्रात पुढं येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी काय तयारी करायला हवी अशा अनेक बाबींची छानशी उलगड या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये होते. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
-
महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी आपली परखड मते मांडली आहेत, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्ट मध्ये. जरुर ऐका, आणि हे राजकीय फटाके कोणते असतील, हे जाणून घ्या.
- Laat meer zien