Afleveringen
-
शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात समाज म्हणून आपण काही करण्याची गरज आहे, हे ओळखून पुण्यातील बालक-पालक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी `वाचन साखळी` संकल्पना रुजते आहे. या संकल्पनेचे प्रणेते विनायक जोशी यांना याच बाबत बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. ही संकल्पना नेमकी काय आहे, त्यातून मुलांचं पुस्तकांशी नातं कसं जोडलं जातं, कोणती पुस्तक त्यांना वाचायला मिळतात, त्यांचा प्रतिसाद कसा असतो अशा अनेक बाबींची उकल या संवादातून होते. नव्या पिढीची बौद्धिक मशागत करु पाहणाऱ्या या उपक्रमाची व्याप्ती वाढण्यासाठी त्यात समाजाचा सहभागही वाढायलाच हवा, त्यासाठी काय करावे हे देखील या संवादातून स्पष्ट होते. प्रत्येकाने जरुर ऐकावा आणि आपल्या परीने इतरांपर्यंत हा विचार, हा उपक्रम पोहोचवावा आणि वाचन-साखळीचा दुवा बनावे.
-
सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची. भारतीय लष्करात ब्रिगेडियर म्हणून सेवा बजावलेले सुमंत दशरथ हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या खेळाचे चाहते म्हणून त्यांनी आजवरच्या सामन्यांचे विश्लेषण आणि काही अंदाज मांडले आहेत. त्याबाबत संतोष देशपांडे यांसोबत रंगलेल्या या स्टोरीटेल कट्ट्यावरच्या गप्पा तमाम फुटबॉलप्रेमींना नक्की आवडतील!
-
Zijn er afleveringen die ontbreken?
-
मराठी साहित्यातील एक अजरामर साहित्यकृती म्हणून 'श्रीमानयोगी' ओळखली जाते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा सहजसुंदर वेध घेणारे सिद्धहस्त लेखक रणजित देसाई यांची ही कादंबरी आता 'स्टोरीटेल' वर श्राव्य स्वरुपात दाखल झाली आहे. त्यास ज्यांचा आवाज लाभला आहे, ते प्रसिद्ध अभिवाचन कलाकार अनिरुद्ध दडके यांच्या समवेत रंगलेल्या या विशेष पॉडकास्ट मधून हा सारा प्रवास तर पुढे येतोच शिवाय 'श्रीमानयोगी' मधून त्यांना घडलेले शिवरायांचे असामान्य दर्शनही घडते.
श्रीमानयोगी ऐकण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा-
https://storytel.com/in/books/shriman-yogi-14292004?utm_source=internal&utm_medium=app_link&utm_campaign=share_links -
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच `एआय` अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल घडवते आहे. माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रावर त्याचा सर्वात मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. त्यातून कित्येकांच्या नोकऱ्या जात आहेत, या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भरतीप्रक्रियाही मंदावली आहे. अशा परिस्थितीत, ज्यांनी आयटी मध्ये शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असे ठरविले आहे, अशांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी नेमके काय करावे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी आयटी उद्योजक मनोज देशमुख यांना बोलते केले. एकूणच सध्या परिस्थिती काय आहे आणि त्यातून आपण काय शिकायला हवे याची उलगड या संवादातून होते. आयटी क्षेत्राचे आकर्षण असणाऱ्या, या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शक ठरेल असा हा खास पॉडकास्ट खास कट्ट्यासाठी.
-
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून अभिमानाने नाव घेतलं जातं ते पुणे गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने विस्तारले आहे. हे होत असताना येथील नागरी सुविधांचा विकास कायमच चर्चेत राहिलेला आहे. नगर नियोजनातील तज्ज्ञ अनिरुद्ध पावसकर यांनी पुणे महापालिकेचे शहर अभियंता म्हणून नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांना याच विषयावर बोलतं केले आहे संतोष देशपांडे यांनी. पुण्याच्या विकासाची दिशा नक्की कशी आहे, गती कुठे मंदावली आहे, येथील नगर नियोजनातील अडचणी कोणत्या, त्यावर काय मार्ग काढला जात आहे इथपासून ते शहर अभियंता म्हणून आपले प्राधान्य कशाला असेल इथपर्यंत अनेक बाबींची उलगड अनिरुद्ध पावसकरांनी या थेट संवादातून केली आहे. पुण्याच्या नागरी समस्यांबाबत सजग असणाऱ्या प्रत्येकानेच ऐकायला हवा असा हा विशेष पॉडकास्ट.
-
इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असणाऱ्या तेलविहिरी, तेथील तेल काढण्याची प्रक्रिया, त्यातील तंत्रज्ञान अशा अनेक बाबींचे कुतुहल सर्वांना आहे. अस्सल पुणेकर असणारे शौनक गाडगीळ हे पेट्रोकेमिकल तंत्रज्ञ गेली अनेक वर्षे प्रत्यक्ष तेलविहिरींवर काम करतात. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून सर्वसामान्य जनांना आजवर अज्ञात अशा अनेक गोष्टी सहजपणे उलगडतात. जगाच्या भवितव्याची दिशा ठरवण्याची शक्ती असणाऱ्या तेलाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित ही माहिती आपणा सर्वांच्या ज्ञानात मोठी भर घालणारी ठरते.
-
आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का? असे प्रश्न मग सर्वसामान्य रसिकांना पडतात. अशीच एक थरारक हेरकथा storytel वर दाखल झाली आहे- समीर चक्रवर्ती ऑपरेशन बलुचिस्तान! तिचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, ज्यांनी स्वतः खासगी गुप्तहेर म्हणून काम केले आहे. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खुद्द संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून अनेक रंजक गोष्टी तर उलगडतात शिवाय इराण आणि अमेरिकेतील संघर्ष, त्याची मूळे यावरही प्रकाश पडतो!
-
वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीसाइड इंडिया या पब्लिशिंग आणि स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांना. यातून खूप रंजक अशी उलगड होते आहे आणि येणाऱ्या काळात वाचनसंस्कृती कशी बदलणार आहे, याचा अंदाजही होतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा संवाद.
-
चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे, आयुर्वेदिक मार्गाने जावे की आधुनिक असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतात. त्यातही ज्यांना काही आजार असेल त्यांच्यासाठी क्लिनिकल न्यूट्रिशन्स कसे मदत करते, त्यांच्यासाठी डायट प्लॅन करताना काय केलं जातं अशा अनेक बाबींची उलगड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट निशा गोडबोले-पुजारी यांनी केली आहे, संतोष देशपांडे यांसमवेतच्या या खास आरोग्य संवादातून.
-
महाराष्ट्राच्या पावन भूमीत डॉ. पारनेरकर महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाची ओळख आता जगभरात होते आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'हार्पर काॅलिन्स' प्रकाशित Know Thy Roots सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून नांदेड येथील डॉ. टी.पी. देशपांडे सरांनी पूर्णवाद आंतरराष्ट्रीय पटलावर आणला. नुकत्याच झालेल्या भारतीय तत्त्वज्ञान परिषदेत त्यावर विशेष व्याख्यान दिले. या पार्श्वभूमीवर, पूर्णवाद म्हणजे नेमके काय, त्याचे महत्व काय, Know Thy Roots मध्ये काय आहे याविषयी डॉ.टी.पी. देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद भारतीय तत्त्वज्ञानामध्ये रुची असणार्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा!
-
Numerology म्हणजेच अंकशास्त्र याचा आपल्या नावाच्या 'स्पेलिंग'शी काय संबंध आहे? आपल्या नावाचे स्पेलिंग बदलून आपले भवितव्य बदलता येते का? असेल तर कसे? या विषयी पुण्यातील प्रसिद्ध Numerology अभ्यासक नीलेश पैठणकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा एकदम 'हटके' संवाद!
हा संवाद युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा- https://youtu.be/Ldek3dxkhDE
-
परकीय भाषा शिकणे केव्हाही उपयुक्त असते, असे आपण ऐकतो. मात्र, आजच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या परकीय भाषा शिकायला हव्यात, कोणत्या भाषांना चांगले भवितव्य आहे याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. परकीय भाषातज्ज्ञ अदिती विशाल यांच्याशी याच विषयावर संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून परकीय भाषा का शिवावी इथपासून कोणती भाषा शिकणे सोपे आहे, कठीण आहे आणि कोणत्या भाषांना नजिकच्या काळात भवितव्य आहे इथपर्यंत अनेक बाबींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड होते. परकीय भाषांविषयी कुतुहल असलेल्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा स्टोरीटेल कट्टा स्पेशल पॉडकास्ट.
हा एपिसोड युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://youtu.be/wSEJ1-oXlx8
-
शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची महत्त्वाची ओळख. ही परंपरा काळाच्या ओघात समृद्ध होत गेली. गेल्या सात शतकांचा वेध घेत त्यातील महत्त्वाच्या नोंदी आपल्यापुढे आल्या आहेत 'हिंदुस्तानी अभिजात संगीताचा इतिहास' या संशोधनसिद्ध ग्रंथातून. प्रसिद्ध गायिका, संगीताच्या अभ्यासक विदुषी अंजली मालकर यांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून हा इतिहास अत्यंत रंजक पद्धतीने पुढे आणला आहे. मराठी भाषेत कदाचित असा हा पहिलाच आणि एकमेव असा अनमोल दस्तऐवज ठरवा. अशा या प्रकल्पाविषयी, तो साकारताना गवसलेल्या आजवर अज्ञात अशा पैलूंविषयी जाणून घेऊया, दस्तुरखुद्द अंजली मालकर यांसमवेतच्या या संवादातून.
-
आजचे आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा अभंग तुकाराम हा नवा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आपल्या शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांच्या माध्यमातून मराठी रसिकांपुढे शिवकाळ उभा करणारे दिग्पाल लांजेकर यांना या नव्या निर्मितीतून काय संदेश द्यायचा आहे, संत तुकारामांचे, त्यांच्या अभंगांचे दर्शन नव्या पिढीपुढे त्यांना का उभा करावेसे वाटले, या प्रवासातील आव्हाने काय होती अशा अनेक प्रश्नांची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या संवादातून अशा अनेक बाबींची उलगड झाली, जी कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. जरुर ऐकावा आणि सर्वांपर्यंत पोहोचवावा, असा हा स्टोरीटेल कट्ट्यावरील स्पेशल पॉडकास्ट...रसिकहो, तुमच्यासाठी.
-
स्मरणशक्ती ही आपल्याला लाभलेली देणच आहे. मात्र, आपण तिचा किती उपयोग करतो हे कोडेच असते. एखादी गोष्ट लक्षात ठेवणे ही खरे तर एक कलाच आहे. म्हणजे नेमके काय, याची उलगड करण्यासाठी मेमरी मॅनेजमेंट अर्थात, स्मरणशक्ती व्यवस्थापनात प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ विष्णू चौधरी सरांसोबत संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून उलगडल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला या कलेच्या अगदी जवळ घेऊन जातात. मेमरी मॅनेजमेंट प्रत्येकाला सहज करता येतं आणि त्यातून त्यांच्या आयुष्याला नवी दिशाही मिळू शकते, याचा आत्मविश्वास जागवणारा हा खास पॉडकास्ट खास आपल्यासाठी.
-
जगभरात दिवाळी साजरी होत असताना आपल्या अंतःकरणात तेज कसे जागवावे, जीवनात खरा प्रकाश कसा आणता येईल, याचं सुरेख विवेचन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये केले आहे. प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि अंतरात साठवावे आणि समृद्ध व्हावे असे हे मौलिक विचारधन.
-
गोष्ट ऐकणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य गोष्ट. गोष्ट सांगण्याचे, ऐकण्याचे माध्यम बदलत जात आहे. पारंपरिक पुस्तक, चित्रपटांपलीकडे जात ऑडिओबुक्स, शॉर्टफिल्म्स आता प्रचलित झाले आहेत. आता मोबाईलच्या माध्यमातून व्हर्टिकल स्टोरीटेलिंगचा ट्रेंडही जोरात सुरु आहे. या सर्व स्थित्यंतराचा वेध स्टोरीसाइड इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या पॉडकास्टमध्ये घेतला आहे.
-
मृत्युनंतर नेमकं काय घडतं, याचं अनेकांना कुतुहल असतं. मात्र, हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याच विषयाची सविस्तर उलगड करण्यासाठी हा मेटाफिजिक्स अभ्यासक आणि अध्यात्मिक समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या लेखिका डॉ. मनिषा अन्वेकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला विशेष संवाद. व्यक्ती मरते म्हणजे काय घडते, माणसाला मृत्युची चाहूल लागते का, जन्म-मृत्यू आणि कर्माचा संबंध असतो का, मृत्यू हा विधिलिखत असतो का, आत्महत्या करणाऱ्यांच्या बाबतीत काय घडतं, आत्म्याशी खरंच संवाद होऊ शकतो का, श्राद्धकर्मे गरजेची असतात का या व अशा अनेक गूढ दडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा हा वेगळा पॉडकास्ट.
हा पॉडकास्ट युट्यूबवर पाहण्यासाठी - https://youtu.be/iPootIBEITs -
मराठी लोकांमध्ये उद्यमशीलतेचा अभाव असल्याने ते उद्योग-व्यवसायात मागे पडतात, मुळात उद्योग करणे हा त्यांचा पिंडच नाही ही सामाजिक धारणा अजूनही आपल्याकडे आहे. ती मोडीत काढून व्यवसायात असणाऱ्या मराठीजनांना एका सूत्रात बांधत एकमेकांच्या साहाय्याने उद्योगात यश मिळवता येते, हे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने दाखवून दिले. कै. माधवराव भिडे यांच्या प्रयत्नांतून आणि प्रेरणेतून रुजलेले हे बीज आता चळवळ बनून अनेक मराठी उद्योजकांच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन आले आहे. `एकमेका साहाय्य करु, अवघे होऊ श्रीमंत` हे ब्रीद सार्थ करण्यासाठी आता `सॅटर्डे क्लब` महाराष्ट्रातच नव्हे तर देशात तसेच परदेशातही विस्तारते आहे. या पार्श्वभूमीवर, सॅटर्डे क्लबची सुरवात, आजवरचा प्रवास, त्यातील वैशिष्ट्ये आणि त्यातून उद्योजकांना मिळत असलेले फायदे याचा लेखाजोखा मांडण्यासाठी संतोष देशपांडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सरचिटणीस (सेक्रेटरी जनरल) सुहास फडणीस यांना बोलता केलं आणि उलगडत गेला एका उद्यमशील चळवळीचा प्रेरणादायी पट. प्रत्येक मराठीजनाने आवर्जून ऐकावा, जाणून घ्यावा असा हा विषय आणि त्यातील प्रेरक आशय.
- Laat meer zien